Monday, January 24, 2011
जीवन संगीत
वी.सु.देशपांडे
०१/०२/२०११ पुणे.
Sunday, January 2, 2011
निळ्या धुक्यातुनि
पीत रेशमी किरणपिसारा पाउलवाटेवरी फुलावा
श्वेतघनांच्या अलगद काठी सूर्यकिरण येउनि चुंबावा
गारठलेल्या तळ्यामागुनी तप्त केशरी सूर्य बुडावा
भान हरपुनी मला बिलगण्या ऊर तुझाही भरोनि यावा
खांद्यावरला पदर ढळोनी धगधगणारा स्पर्श घडावा
वीज नखातुनि झिणझिणताना ह्रुदयाचा ठोका वाढावा
रसरसलेल्या दोन जिवांवर शाल धुक्याची पसरुनि यावा
मिठीतुनी वितळता गुलाबी थरथरणारा ओठ धरावा
ओठांवरती ओठ निरंतर मधु ओष्ठ अम्रुत रस प्राशावा
तलम रेशमी केसांमधुनी नकळत माझा हात फिरावा
आनंदाश्रू लाजुनि अलगद गालावरुनी सहज गळावा
- वीरेंद्र देशपांडे १६/०१/२०११
Friday, December 17, 2010
Cafe Blue
Blue smoke was filled in the air
Spotlights had overwhelming glare
The saxophone tune was very rare
Jazz music had unusual flair
He was reclined in the corner chair
He was tall, handsome and fair
He had deep blue eyes and unavoidable stare
He was single, he haven't had a pair
A beauty on the stage was blond and fair
She was teasing him, but he didn't care
Nobody knew he was a city mayor
-Veerendra Deshpande 17/12/2010
Tuesday, October 12, 2010
माझे शालेय जीवन
प्राथमिक शाळेत "या कुन्देन्दुतुषारहार धवला" हा श्लोक आम्ही प्रार्थना म्हणून म्हणत असू. त्यातलं बाकी सर्व विसरुन "नि:षेश जाड्या पहा" इतकंच काय ते आता माझ्या लक्षात आहे. आम्ही काही टवाळ मुलं, प्रार्थनेसाठी मिटलेले डोळे हळूच उघडून "नि:षेश जाड्या पहा" असं म्हणून आमच्या वर्गातल्या जाड्या मुलाकडे बघून एकमेकांकडे बघून हासत असू.
शनिवारी सकाळी लवकर उठून शाळेला येऊन भीमरुपी म्हणताना कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे ऐवजी "झोपावे उत्तरेकडे" हे अगदी मनापासून वाटत असे. त्या वयात मी खूप हुंदडायचो. संध्याकाळी खेळून दमून आल्यावर, ग्रुहपाठ करायला बसलो की, कंटाळा करायचो. आई नेहमी म्हणायची, दिवस गेला उठारेठी अन् चांदण्यांखाली कापूस वेची. त्या वयात देखिल "छडी लागे छमछम विद्या येई घमघम" हे गाणं मला कधीही आवडलं नाही तुम्हाला सांगतो. अहो छडीच्या तालावर खेळ करुन दाखवायला आम्ही काय सर्कशीतले प्राणी होतो का?
मी कितीही लपवलं तरी माझ्या नावावरुन मी माझ्या हुशार भावाचा धाकटा भाऊ आहे हे सर्व शिक्षक ओळखायचे. तोही त्याच शाळेचा विद्यार्थी. तो हुशार, कायम पहिला येणारा आणि मी त्याचा धाकटा भाऊ मात्र सामान्य बुध्दीचा. या कारणास्तव मी शिक्षकांचा खूप मार आणि मानसिक छळ सहन केलाय. माझ्या बुध्दीनुसार उत्तम मार्क मिळवूनही माझे कधीही कुणी कौतुक केल्याचे मला स्मरत नाही. ५वीत असताना माझा वर्गात सहावा नंबर आला होता. इयत्तेतला आमचा सर्वांत हुशार वर्ग. त्यामुळे वर्गात सहावा नंबर येणं ही माझ्यासाठी खूप मोठं यश होतं. पण आमच्या तत्कालीन वर्गप्रमुख बाईंनी मला स्टाफ रुम मधे बोलावून तुझ्याकडून पहिला नंबर येण्याची अपेक्षा होती हे सांगून मला चांगलेच झाडले होते. त्यातून आमच्या वर्गातल्या एका हुशार मुलाने माझा सहावा नंबर मेहनत हुशारीने नसून मला चित्रकलेत मिळालेले भरपूर मार्क आहेत हे सांगितले. तू चित्रकलेच्या जोरावर अत्ता चांगले मार्क मिळवशील, पण सातवी पर्यंतच चित्रकला हा विषय असतो. त्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही; हे सांगितले. यानंतर घरी नातेवाईक व ओळखीच्या मंडळींकडूनही बोलणीच खावी लागली. या घटनेचा माझ्या मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला असावा. त्यानंतर त्यापेक्षा अव्वल नंबर शालेय जीवनात मी कधीच मिळवू शकलो नाही. पण याच बाईंनी वर्गातले मागचे फळे व वर्गाबाहेरचा फळा बरेचदा माझ्याकडून लिहून घेतलाय. अक्षर व चित्रकला दोन्ही चांगले असल्याने फक्त हस्तलिखितांच्या वेळी त्यांना माझी बरोबर आठवण यायची.
अभ्यासात तसा मी इतकाही काही वाईट नव्हतो. कधी कुठल्या विषयात नापास झालोय असेही नाही. वास्तविक मी "ढ मुलगा" या कॅटॅगरीत मोडणारा मुलगाच नव्हतो. पण तसा आव आणून कित्येक शिक्षकांनी शब्दश: नसला तरी माझा आत्मविश्वास मोडून काढला होता. तसा मी १० वीत ८० टक्क्यांच्या वर मार्क काढलेला मुलगा. पण ते सारे काही घाबरुन मिळवलेले मार्क. मनापासून मिळवलेले नव्हे. चित्रकला सोडून तसा कमीअधिक प्रमाणात मी सगळ्याच विषयांना घाबरायचो. गणितात जॉमेट्री ची ड्रॉईंगशी जवळीक वाटत असल्याने तो अल्जेब्रा च्या मानाने जरा सोपा वाटे. सायन्स मधला आक्रुत्यांचा भाग मला फार आवडत असे. पण शिक्षण मंडळ काय कुणाला आनंद मिळू देणार. आक्रुत्यांचा आनंद घालवण्यासाठी आक्रुत्या काढून नावे लिहावी लागत. आक्रुती कितीही चांगली काढली तरी नावांमुळे आमचा त्रिफळा उडायचाच. इंग्रजी विषयात "टू बी चे प्रत्यय" ही नक्की काय भानगड आहे हे बरेच वर्षं मला ठाऊक नव्हतं. त्यातून ड्रॉईंग च्या 2B ची पेन्सिल शी असणारी माझी जवळीक माझा घोळ वाढवत असे. पुढे कित्येक वर्षांनी to be or not to be मधलं हे टू बी आहे, हे कळल्यावर मी थंडच पडलो. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि स्पेलिंग; इंग्रजीतल्या या स्पेलिंगना मी त्रुतीय पंथियांपेक्षा जास्त घाबरत आलो आहे. त्यामानाने उच्चाराला तितके महत्व नव्ह्ते. आमच्या इंग्रजीच्या पुस्तकात "ए डब्ल्यू ई एसोएमी" असा एक शब्द होता. बर्याच वर्षांनी तो awesome असा उच्चारतात हे समजले. आमचे इंग्रजी हे इतके awesome होते.
आमच्या वेळी पुस्तकातल्या महत्वाच्या ओळींना अंडरलाईन करुन ठेवायचं एक फैड निघालं होतं. पण त्यातले महत्वाचे काय हे न ठरवता आल्याने व, आणि असे उभयान्वयी प्रत्यय सोडून बाकी सगळ्याच पुस्तकाला मी रेघा मारु लागलो. तशी लाईन मारायची सवय आमची तेव्हापासूनची आहे. असो.
पण, तश्या अनेक गोष्टी मला अजूनही कळलेल्या नाहीत. त्यातच hertz हे परिमाण मराठीत कसं लिहायचं हे मला अजूनही जमलेलं नाहीये. एकदा शास्त्राच्या पेपरात मी हटज किंवा हडज किंवा हटई असे लिहिले होते. त्यानंतर आमच्या तत्कालीन मास्तरांनी माझी जी हेटाई केली; काही विचारु नका. तसेच गणितातले फॉर्म्युले लक्षात ठेवणं हेही मला कधीही जमलं नाही. त्यामुळे लॉजिक समजूनही केवळ फॉर्म्युला पाठ नाही म्हणून मी गणितात मार खाल्ला आहे. "संप्रति वार्ता: श्रुयन्ताम्! प्रवाचक: बलदेवानंद सागर:" अश्या त्या संस्क्रुत बातम्या त्या काळचे हुशार विध्यार्थी ऐकत असंत. पण संस्क्रुत तर पाठांतरावर आधारीतच विषय आहे असे आम्हा "ढ" मुलांना सांगण्यात आले असल्यामुळे मी आधी संस्क्रुत सुभाषिते पाठ करणे, मग अर्थ समजत नसल्यामुळे त्याचा अर्थ पाठ करणे, आणि शेवटी कुठल्या श्लोकाचा कुठला अर्थ आहे ह्या जोड्या पाठ करणे; अशी मेहनत आम्ही पट्टीच्या धाकावर केली आहे. या असल्या नुसत्या घोकंपट्टीचा काय उपयोग? अर्थात पट्टीच्या धाकावर घोकली जाणारी क्रुती म्हणूनच त्याला घोकंपट्टी म्हणत असावेत. ही आमच्या संस्क्रुत ची अवस्था. घरी पूजाविधीत गुरुजी जे संस्क्रुत श्लोक म्हणतात ते समजले तर संस्क्रुत शिकल्याचा काहीतरी उपयोग.
कुणीही महान लढवय्या, स्वातंत्र्यसैनिक, शास्त्रद्न्य किंवा तत्वद्न्य आमच्या अभ्यासात आला की लगेच किती मार्कांची टीप येऊ शकते? यावर त्यांचे महत्त्व मोजले जायचे. मग सनावळ्यांसहित ते पाठ करणारे परीक्षार्थी चांगले का त्यांचे खरे कार्य काय होते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करताना, सनावळ्या पाठ न केलेले विद्यार्थी चांगले? तसेही परिक्षेपुरतेच पाठ करायच्या अभ्यासक्रमातल्या पुस्तकांना, पाठ्यपुस्तक न म्हणता पाठपुस्तक म्हणायला काहीच हरकत नाही. पण बहुधा ते ठरवणारे ग्रुहस्थ साठ्ये आडनावाचे असले पाहिजेत. कारण त्याशिवाय त्यांनी आपल्या आडनावाप्रमाणे ठ ला य जोडला नसता असं माझं स्पष्ट मत आहे. पण नेमकं नको तिथे आपलं स्पष्ट मत व्यक्त केल्यानेही मी बराच मार खाल्ला आहे. मला आमचे चित्रकलेचे शिक्षक आवडतात हे माझं स्पष्ट मत आमच्या शास्त्र शिकवणार्या शिक्षकांना न आवडल्याने सहावीत त्यांनी डूक धरुन मला चांगलाच चोपलाय. एखादा विषय आवडत असल्याने त्या विषयाचे शिक्षक आवडणं हे किती साहजिक आहे. पण संपूर्ण वर्गात मी अन् माझा मित्र सोडून बाकी सर्वांना शास्त्राचे शिक्षक आवडत होते. त्यांचा इगो दुखावला गेला आणि मग माझं गालफाड.
"मराठी असे आपुली मायबोली" वगैरे ऐकल्यामुळे व स्वत:ची मात्रुभाषा असलेला हा मराठी विषय अवघड जाण्याचे खरेतर काही कारण नाहीये. कवितेतल्या यमकांच्या जोड्या काय, उत्प्रेक्षा आणि उपमा काय? मला तर उपमा म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटायचं. पण "कवीने येथे बुडत्या सूर्याची उपमा कोणाला दिली आहे?" असल्या कुठल्यातरी प्रश्नानंतर ते सुटलेलं तोंडचं पाणी पळून जायचे. आम्हाला जे धडे होते ते केवळ आम्हाला धडा शिकवण्यासाठीच तयार केले होते अशी मला खात्री आहे. धडे वाचायला मला आवडायचं पण संदर्भासहित स्पष्टिकरण या प्रकाराने मात्र मला चांगलाच धडा शिकवला. छे! शाळेत मराठी भाषा, नव्हे एकंदर पुस्तकांविषयीच जो तिरस्कार निर्माण झाला, तो दूर करायला वयाची विशी पार करावी लागली.
प्रत्यक्ष परिक्षेच्या काळात "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" यातलं "एकमेका सहाय्य करु" इतकंच सोयीस्कर रित्या आम्ही पाळत असू. चित्रकला विषय सोडल्यास बाकी सर्वच विषयात मला दुसर्यांचे सहाय्य घ्यायची वेळ यायची. आमच्या शाळेतला चित्रकलेचा वर्ग मात्र इतका सुंदर व सुसज्ज चित्रकला वर्ग होता, तितका आमच्या कला महाविद्यालयात सुध्दा नव्हता. प्रशस्त जागा, खास चित्रकलेसाठी योग्य असे बाक, भिंतींवर सुंदर चित्रांच्या फ्रेम्स. या वर्गात खिडकीतून येणार्या सुंदर प्रकाशात बसून मी नेचर ड्रॉईंग शिकलो, स्टील लाईफ शिकलो, तासंतास बसून संकल्पचित्रं रंगवली. इतकंच काय तर ५वी ते ७वी च्या सहामाही व वर्षिक परीक्षेचे पेपरही तपासायला मदतही केली. मी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या चित्रकला शिक्षकांच्या आग्रहास्तव शाळेत त्यांना मदत करायला जात असे. चित्रकलेच्या पेपरांचे योग्यतेनुसार वर्गीकरण करायचे. मग आमचे सर मार्क देताना मला विचारायचे किती देऊ. ४६, ५८, ४१ असे मी सांगत असे आणि त्यांना योग्य वाटल्यास तेच मार्क त्या पेपरला मिळत. चित्रकलेच्या फईल्स, पेपरांचे गठ्ठे लावणे वगैरे बराच वेळ काम करुन दमल्यावर कांदा भजी व चहा सरांतर्फे मिळत असे.
दहावीत असताना, बोर्डाचे पेपर हे नेहमीच्या फुलस्केप कागदापेक्षा रुंद असतात हे समजले. त्यामुळे दोन्ही बाजूला पुरेसा समास सोडून, जाड पॉईंटच्या पेनाने सुटसुटीत व मोठ्या अक्षरात, प्रत्येक मुद्दा स्वतंत्र ओळीवर असा पेपर लिहिला असता; अर्ध्या पानाच्या आत संपणारा उत्तराचा मजकूर पानभर पुरुन उरतो व भरपूर पुरवण्या लावल्याने आपल्या पेपराचे चांगले वजन परिक्षकावर पडते. असा कानमंत्र आम्हाला मिळाला होता. पण त्यातल्या मजकूरापेक्षा आम्ही हस्ताक्षरावरच जास्त मेहनत केल्यामुळे अपेक्षित निकाल काही गवसला नाही. शाळेतून बाहेर पडल्यावर आयुष्याचा सूर गवसला, हे काही कमी नाही. "मनाप्रमाणे झाले तर चांगले, मनाप्रमाणे नाही झाले तर जास्त चांगले" असं कुणीतरी म्हणून ठेवलंय ते एकप्रकारे बरोबरंच आहे. आज मागे वळून बघताना, शालेय जीवनात मिळालेले चित्रकलेचे बाळकडू माझ्यातल्या कलावंतासाठी अम्रुतासमान ठरले हे मात्र निश्चित.
वी.सु.देशपांडे
१२/१०/२०१० पुणे.
टीप- सदर लेखात व्यक्त केलेली मते ही माझी व्यक्तिगत आहेत. त्याच्याशी कुणी सहमत नसल्यास हरकत नाही. तुमच्या मतांचाही मी तितकाच आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मात्र क्षमस्व.
Friday, June 25, 2010
नदी
सारी जमीन नापीक करत जातो
नदी सागराला मिळताना
सारे काही सम्रुध्द करत जाते
- वीरेंद्र देशपांडे २५/०६/२०१०
सहजच
तसे सहजच कळ्ती, एकमेकांचे मनसुबे
तव मुखचंद्र पुनवेचा, मज मनात भरती
तू घेता उंच झोका, मज जीव खाली वरती
तू भिजता पावसात, मी चिंब चिंब होतो
तू फिरता वार्यावर, मी शहारुन जातो
तू मनी गुणगुणले, कुजबुज ये मज कानी
जे भाव तुज मनी, ते काव्य मज पानी
तू झोपल्यावरच, माझा डोळा मिटतो
स्वप्नं तुला पडता, मी दचकून उठतो
तव चरण जळात, तरंग मज मनात
मेंदी तव हातास, रंग मज स्वप्नास
तू मिरची खाता, ठसका मज लागतो
तिथे पाऊस पडता, इथे मोर नाचतो
- वीरेंद्र देशपांडे २५/०६/२०१०
Sunday, April 25, 2010
कृष्ण-सोंगाड्या
कृष्ण: कुठे गेल्या बरे सगळ्या? संध्याकाळच्या वेळी एकही गवळण दिसत नाही?
सोंगाड्या: कृष्णदेवा, समद्या गवळणी ऑफिसात गेल्यात. राधा गौळण एका कॉलसेंटर कंपनीत, सुपरवायझरे. ललिता, विशाखा, चंद्रा, सुंद्रा, श्यामा, भामा समद्या कॉलसेंटर मधे नोकरीला लागल्यात, अन् समद्या कष्टंबर कॉल अटेंड करतात.
कृष्ण: कुठे?
सोंगाड्या: चिंचेवाडीत. अन् बाकीच्या थराडी का कुठं ते जात्यात.
कृष्ण: अरे पण आता संध्याकाळ झाली त्यांची परतण्याची वेळ झाली असेल.
सोंगाड्या: कृष्णदेवा, त्या समद्या सेकंड शिफ्ट करतात. दुपारी जातात अन् रात्री उशीरा येतात.
कृष्ण: आणि मग त्यांचे नवरे? ते काय करतात?
सोंगाड्या: ते सगळे आयटीत आहेत.
कृष्ण: म्हणजे? नुसते ऐटीत बसून खातात? आणि बायकांना कामाला जायला लावतात?
सोंगाड्या: तसं नव्हे कृष्णदेवा. आयटी म्हणजे, "इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी". ते समदे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते भी बारा-बारा तास काम करतात. बायका सकाळी स्वयपाक करुन मुलाला पाळणा घरात सोडून जातात. नवरे संध्याकाळी येताना मुलाला घेऊन येतात व रात्रीचा स्वयपाक करतात.
कृष्ण: मग आता या गवळणी कधी भेटणार?
सोंगाड्या: पॅनिक होऊ नका कृष्णदेवा. आपण त्यांना वीकेंड ला गाठू.
कृष्ण: वीकेंड म्हणजे काय?
सोंगाड्या: अरे अरे कृष्णदेवा! तुमचं जनरल नॉलेज फारच सामान्य दिसतंय. तुम्ही कलियुगात अवतार घेण्याआधी सांदिपनी रुषिंच्या आश्रमात ट्रेनिंग घ्यायला गेला होता ना? सांदिपनी रुषिंनी तुम्हाला लेटेस्ट हॅपनिंग काहीच शिकवलं नाही वाटतं? वीकेंड म्हणजे आठवड्याचा शेवट, शनिवार-रविवार. त्याच दिवशी या मंडळींना सुट्टी असते. त्यामुळेच मी म्हटलं की, गौळणींना भेटायला तुम्हाला वीकेंडपर्यंत वाट पहावी लागणार.
कृष्ण: अरे, असा धीर सोडू नकोस! मी मुरली वाजवितो.
सोंगाड्या: बासरीची आडिओ क्वालिटी पॉलिफोनिक आहे का एम्पीथ्री?
कृष्ण: आम्ही समजलो नाही.
सोंगाड्या: कृष्णदेवा, तुम्हाला असल्या मेट्रोसिटीत राहायचं असंल तर तुमचं नॉलेज अपटुडेट ठेवायला हवं. जाऊ दे, तुम्ही वाजवा बासरी.
(कृष्ण बासरी वाजवितो.)
कृष्ण: एकदेखील गवळण आली नाही?
सोंगाड्या: मेंढी. ती बघा मेंढी आली. अन् बघा तो धनगर आपल्या मेंढ्या चरायला घेऊन येतोय.
काखंमंदी लॅपट्वाप वळचणीला मॉबाईल
मुखी तुझं नाव सदा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी
मोबाईल नि लॅपट्वाप घेऊ द्या की रं
मला भि आयटीत येऊ द्या की रं
व्हिसा नि पासपोर्ट घेऊ द्या की रं
मला भि युएस् ला जाऊ द्या की रं
कृष्ण: हे लोकसंगीत फार वेगळे वाटते आहे.
सोंगाड्या: हे लोकल संगीत.
कृष्ण: लोकल संगीत नव्हे लोकसंगीत
सोंगाड्या: कृष्णदेवा, लोकसंगीत एका प्रकारे लोकल संगीतच आहे. आणि आज ग्लोबलायझेशनच्या जमान्यात प्रत्येक लोकल गोष्ट ग्लोबल होत आहे. तशात हे लोकल संगीत ग्लोबल झाल्याशिवाय कसं राहील?
कृष्ण: पण अजून एकही गवळण आली नाही.
सोंगाड्या: कृष्णदेवा, मी सांगतो तसे करा. तुमच्या मॉबाईल मधली एखादी रिंगटोन वाजवा.
सिर पटक पटक के कह रहा है तू भी जा
मेरे पास तू न आ, जिंदगी से चली जा
सोंगाड्या: रिडिक्युलस! थांबवा ते.
कृष्ण: पण रिडिक्युलस म्हणजे काय?
सोंगाड्या: अरे अरे, कृष्णदेवा! तुम्ही ते इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मधे जायचं सोडून सांदिपनी रुषींच्या आश्रमात गेलात ना त्याचाच हा दुष्परिणाम. रिडिक्युलस या शब्दाचा संधी विग्रह, "रेडा + किळस = रिडिक्युलस" असा आहे.
कृष्ण: ती बघ! ती कोण येते आहे? चंद्राच ती. थांबव तिला.
सोंगाड्या: थांबा चंद्राबाई.
चंद्रा: शी! तुम्ही एटिकेट्स वगैरे कधी शिकला नाहीत का?
(सोंगाड्या कृष्णाकडे बोट दाखवतो)
कृष्ण: एटिकेट्स! पण आम्ही तर कायम एटिकेटीवरच शिकत आलो आहोत.
सोंगाड्या: कृष्णदेवा, ते एटिकेटी वेगळं आणि एटिकेट्स वेगळे.
कृष्ण: असो. तुम्ही कुठं मथुरेच्या बाजाराला निघालात वाटतं.
चंद्रा: मथुरेचा बाजार? नाही काही, मथुरा शॉपिंग मॉल.
कृष्ण: मथुरा शॉपिंग मॉल?
सोंगाड्या: कृष्णदेवा, मथुरा शॉपिंग मॉल म्हणजे एका अर्थी मथुरेचा बाजारच नाही का? पण मग तुम्ही ऑफिसला नाही जात का?
चंद्रा: नाही. मी माझं ऑफिसचं काम नेटनेच करते.
कृष्ण: वा! किती नेटाने काम करते, बघितलेस?
सोंगाड्या: कृष्णदेवा, नेटाने न्हाई. त्या नेटने म्हणजे इंटरनेटने आपले काम करतात.
चंद्रा: अय्या मला लवकर जायला हवं. नाहीतर सगळ डेटा करपेल.
सोंगाड्या: काय?
चंद्रा: अहो परवा चुकून नेट जास्त वेळ चालू राहिलं तर सगळा डेटा करपला. मी जाते...
कृष्ण: बाकीच्या गवळणी कुठे आहेत? अता तरी त्यांची ऑफिसं सुटली असतील.
सोंगाड्या: ते खरं आहे कृष्णदेवा. पण इथले रस्ते आणि ट्राफिक...
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे
सोंगाड्या: त्यामुळे त्यांना परत यायला अजून बराच वेळ आहे. तोवर तुम्ही आपली गीतेची सीडी लावा.
कृष्ण: गीतेची सीडी?
सोंगाड्या: बरोबर! तुम्हाला ठाऊक नसेल कृष्णदेवा. नुकतेच एका इतिहास संशोधकाच्या मते, द्वापरयुगात झालेल्या कौरव पांडव युध्दात आपण अर्जुनाला ऐकविलेली गीता ही वास्तविक तुमच्या करंगळीत कायम फिरणार्या सीडीत लिहिलेली होती. ज्याला आपण आजपर्यंत "सुदर्शन चक्र" या नावाने ओळखत होतो आणि ही गीता आपण इंटरनेटवरुन एम्पीथ्री डाऊनलोड करुन आपल्या सीडी वर लिहून ठेवली व मग अर्जुनाला ती ऐकवली. त्यांनी त्या सीडी चे पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे. तेव्हा, ती सीडी लावा, तोवर आपण थोडी विश्रांती घेऊ.
- वीरेंद्र देशपांडे २५/०४/२०१०
Sunday, April 11, 2010
कोण गेले
अवसेत पूर्णचंद्र उगवून कोण गेले
तपत्या मनात माझ्या वैराण ते उन्हाळे
डोळ्यात पावसाळे बरसून कोण गेले
मन पहिल्या आसवांत भिजवून चिंब ओले
मज मिठीत हा ह्रुद्गंध पसरून कोण गेले
खिडकीत मंद वारा छेडे हलके बोले
श्वासांत वादळे ती उठवून कोण गेले
मिठीत चंद्र बिलगे ओठी रात्र उमले
मीलनी मादक धुंद हरपून कोण गेले
रात्रीत चंद्र झुरे देहात रात्र फुले
क्षितिजी पहाट तारा उगवून कोण गेले
- वीरेंद्र देशपांडे १०/०४/२०१०
Tuesday, April 6, 2010
दोन तास
ज्यांना कविता माहीत नाही त्यांनी ती अगोदर वाचून घ्यावी:
दोन दिवस - नारायण सुर्वे
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
-------------------------------------------
दोन तास
दोन तास जीम करण्यात गेले दोन कोमात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेय पोटावर चरबी
शेकडो वेळा वॉर्मअप केले, जीम केले, कार्डिओ झाले
फिटनेसचा मंत्र शोधण्यातच एनर्जी बर्बाद झाली
हे स्नायू माझे सर्वस्व, इन्स्ट्रक्टरकडे गहाणच राहिले
कधी स्नायू फुगलेले, कधी शिथील झालेले पाहिले
हरघडी घाम वाळविला नाही; पण असाही क्षण आला
तेव्हा घामच मित्र होऊन साहाय्यास धावून आला
प्रोटीनचा आहार हरघडी केला अगा जाडसर झालो
वजन पेलावे कसे, पुन्हा रोडावे कसे, हेच जिममधे शिकलो
दिवसरात्र ओढावा कोलू तसे शरीर प्राण थकले
दोन तास जीम करण्यात गेले दोन कोमात गेले
- वीरेंद्र देशपांडे ०६/०४/२०१०
*तळटीप: वर वापरलेला वजन हा शब्द केवळ कवितेच्या व्याकरणा संदर्भात आहे.
Friday, March 12, 2010
एकटा
फाटके कपडे लांब दाढी केसांच्या जटा
युगानुयुगे अंधारात एकच दिवटा
धुंडाळतोय रानोमाळ अज्ञाताच्या वाटा
डोंगर नद्या जंगलं समुद्र पार झाले
अन्नपाण्याविना अविश्रांत चाले
दु:खाच्या डोंगराखाली अश्रूंचे तळे
मनाच्या मिट्ट गुहेपुढे पश्चात्ताप जळे
अशक्तपणाने ग्लानी येऊन पडे
कुणी औषधपाणी केल्याने जगे
तिथूनही तो अपरात्रीच पळे
पुढच्या गावी तेल मागत फिरे
ठाऊक नाही काय घडले होते पाप
मानवी शरीराला अमरत्वाचा शाप
युगांचे हिशोब लिहून गुहा बरबटतात
भाळी जखम ठणके जर्जर शरीरात
- वीरेंद्र देशपांडे १२/०३/२०१०
Sunday, February 21, 2010
आठवणी
- वीरेंद्र देशपांडे २१/०२/२०१०
Monday, February 1, 2010
शीळा
परंतु जिवलगांनी ढुंकूनिही न पाहिले
हाय लोकांनी मला शीळाच बनविले
दु:ख इतुके की रामानेहि मज चुकविले
- वीरेंद्र देशपांडे १४/०१/२०१०
एक नकार
अजूनहि भरले नाहीत घाव, जे बसले थेट वर्मी
अता नको दुसरा नकार, चालले आहे ते बरे आहे
तोवर तू माझीच अशी मनाची समजूत घातली आहे
- वीरेंद्र देशपांडे १४/०१/२०१०
Thursday, January 14, 2010
अता नको
माणूस म्हणून आयुष्याकडून हरल्याचे भान
त्यापेक्षा मोहातून सोडवून घ्यावा आत्मा
गुंतण्याआधी कोठे जीव ध्यावा परमात्मा
मन गुंतवण्यापेक्षा हात गुंतवणे खरे
ह्रुदय जुळवण्यापेक्षा शब्द जुळवणे बरे
नव्या म्रुगजळांपेक्षा जुनी वाळवंटे खरी
अंधूक सुखापेक्षा स्पष्ट दु:खे बरी
नको नव्या आशा पुढे दारूण निराशा
काहीच नसते शाश्वत, अशाश्वत निराशा
दु:ख कसे आपले हक्काचे असते
त्याला तरी निदान कवटाळून बसता येते
दैव ही न होते माझे कर्महि न होते
प्राक्तनाचे भोग अन् पाप माथी होते
कुणाकडे आता उ:शाप हे मागायचे
जन्मलो त्याचेहि पश्चात्ताप व्हायचे
- वीरेंद्र देशपांडे १४/०१/२०१०
Wednesday, December 23, 2009
हल्ली
ते सारं मलाही कळतंच असं काही नाही
कविता, गाणी, गझला, कधी श्लोकही
हे सारं वेड्यासारखं काय चाललंय, असं म्हणतेही आई
ज्या दिवसापासून ती मला सोडून गेली
अजून तशीच जपली आहे मी माझी खोली
तिची पत्रं, तिचे फोटो, भेटवस्तू, माझ्या कविता
पहिल्या भेटीतला रुमाल, जाताना विसरलेली ओढणी
तश्याच जपल्या आहेत खुणा, मी कवितेच्या पुस्तकातल्या
ते दिवसही तिथंच थांबलेले, त्या कविताही तिथंच थांबलेल्या
अर्ध्या झोपेत अडलीच एखादी ओळ, तर स्वप्नात अडतोच श्वास
म्हणून उशाशी बाळगतोच मी सारे कवितासंग्रह
हल्ली कितीही जपलं तरी उसवतंच जाते मनाची शिवण
खिळखिळे होतात धागे अन् निखळतातच पाने कवितेची
हल्ली निघतातच खपल्या जुन्या जखमांच्या
आणि जीवनाच्या पानावर सांडतेच शाई
कवितांची वही उघडली की फुटतातच सारे बांध
भिजते कवितांची वही अन् भरतेच खोली अश्रूंनी
भिजत पडल्या प्रश्नांप्रमाणे तरंगत राहते सारे, मी माझी उदासीही
पण फक्त धुतली जाते शाई, कागद होतात कोरे, पण राहतातच ओले
असा गाव वाहून जायला यावेच लागतात अश्रूंचे पूर
असे भिजले मन वाळायला द्यावेच लागते विचारांचे ऊन
- वीरेंद्र देशपांडे २३/१२/२००९
Sunday, December 6, 2009
आता वाटतं...
जशी सहजच सुटे सुरगाठ, पण आहे ती निरगाठ
कसा विसरणार तिचा स्पर्श, तिचा गंध, पहिली मिठी
पावसात चिंब भिजलेली अन् थरथर माझ्या ओठी
हसता हसता कधी आठवेलंच ना तिचा हसरा चेहरा
रडता रडता आठवेलंच ना अश्रूंनी भिजलेला खांदा
प्रत्येक क्षण तिच्याच नावावर, प्रत्येक श्वासात तिचाच उष्ण श्वास
हे क्षण परत कसे फेडू? हे श्वास परत कसे सोडू?
नाळ जेव्हा तुटते, नाते जेव्हा मिटते, तेव्हा काय वाटते?
मायेची अंथरलेली चादर फाटते
एका क्षणापूर्वी आपलं सर्वस्व असलेलं कुणी
दुसर्या क्षणी आपलं कुणीच उरत नाही
-वीरेंद्र देशपांडे ०६/१२/२००९
अजूनही!
अजूनही तुझ्याच मिठीची ऊब झगडतेय या थंडी पावसाशी
तू दिलेल्या मोगर्याच्या कळ्या ओंजळीत ठेऊन मी भिजतोय
तुझीच ओढणी लपेटून मी अजूनही तिथंच बसलोय
अजूनही माझ्या श्वासाश्वासात तुझाच उष्ण श्वास
रंध्रारंध्रातून तुझीच आस, पावलोपावली तुझाच भास
माझा रस्ताच थांबलाय त्या वळणावर, अन बुध्दी थिजलिये
ठोकाच चुकलाय त्या समेवर, पण अजूनही मन वेडं गातंय तुझीच गाणी
आता मला माझं नाव आठवत नाही, मला माझं गाव आठवत नाही
पण अजूनही आठवते आहेस ती, फक्त तू! ... फक्त तूच!
- वीरेंद्र देशपांडे ०६/१२/२००९
त्रिकाल
लग्न आहे भविष्य
ही चारोळी हे वर्तमान
प्रेयसीची आस मात्र आहे त्रिकाल
- वीरेंद्र देशपांडे ०५/१२/२००९
Monday, August 25, 2008
तो निघे हिंदवी राजा
मिटविण्या जुन्या अपमाना
घेऊन नभाशी पैजा
तो निघे हिंदवी राजा
मुठभर सैनिक साठ
शिलेदार खास आठ
रणकंदन ते शत्रूचे
तांडव केवळ म्रुत्यूचे
स्तब्ध तयाचा श्वास
अचूक लक्ष्य वेधत
घुसती भाले खडगे
ढालींचे पडती तुकडे
घेऊन घोट नरडीचा
तो सडा पडे रक्ताचा
छातीत खुपसुनी भाला
छाटून हाता पायाला
घालून माळ मुंडक्यांची
लाऊन रास प्रेतांची
ती थंड हवा फुफुसात
अन तडफड काळजात
बाणांनी नभ झाकोळी
रक्ताला येई उकळी
जरी बाहेर ये कोथळा
म्रुत्यूचा सुंदर सोहळा
भय पकड न घे मनाची
उमटे रेष हास्याची
ज्यां रक्त पाण्यासम स्वस्त
ढोसून जाहले मस्त
त्या उन्मत्त हत्तीला
अंकुश ज्यांनी लाविला
मस्तके रणी अर्पून
रक्ते अभिषेक करुन
सर्वस्व ज्यांनी त्यजून
मात्रुभूमीला पुजून
कधी न हार मानणे
कधी न शरण जाणे
रणांगणी रक्त सांडणे
देशसेवे प्राण देणे
प्रजेसाठी, मुलांसाठी
न्याय, स्वातंत्र्यासाठी
तत्व, कारणांसाठी
एका वेड्या आशेसाठी
त्वां शौर्य आम्हा संघटे
त्वां कर्त्रुत्वे आम्हा बळ ये
पुढल्या अगणित शतकात
कुणी स्वतंत्र ये मातीत
विसरुन स्वत:च्या व्यथा
हे दगड सांगतील कथा
त्या शूरवीरांच्या गाथा
अभिमाने उंच हो माथा
- वीरेंद्र देशपांडे २००८
Sunday, June 29, 2008
रांधायला
नुसतंच सोडतोय शब्दांचं पीठ
चाखून बघायला वेळ नाही
कमी-जास्त आहे का मीठ
खमंग खरपूस वर थर
आत गरम तिखट ओवा
शब्द चांगले तळले वर
म्हणे आत अर्थाचा मेवा
सोडता-सोडता सुटतात शब्द
सारेच होतात मुक्तछंद
नवकवितेच्या नावाखाली
वेडीवाकडी करपलेलीही खपली
चहाच्या गरम घोटाबरोबरच
कवितेचा आस्वाद घ्यावा
तशी नुसती नाहीच मजा
आणि हवी पावसाळी हवा
कवितेबरोबच देतो
तळल्यानंतर खाली उरलेले
स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, चारोळ्या
छान खरपूस लागतात हो! ... म्हणे
कवितेचे असे हे घाणे टाकून
स्वत:ला कवी म्हणवून कंटाळा आलाय
म्हणून पंचपक्वान्नाच्या स्वयंपाकासारखी
रांधायला शिकायची आहे मला कविता
Wednesday, June 18, 2008
प्रश्नपत्रिका
सविस्तर उत्तरे द्या म्हणल्यावर मी मुद्दामून एकाच वाक्यात उत्तरे देतो त्यांना
आणि मीच लिहिलेल्या कवितेत ठेवतो गाळलेल्या जागा अन् म्हणतो भरा
विचारतो सनावळ्या मी जगलेल्या क्षणांच्या नि घालतो गणितं माझ्या सुख-दु:खांची
माझ्या आयुष्यातल्या जोड्या लाऊन दाखवा बघू
सांगा बरे प्रेमाचे प्रमेय काय आणि ते सिद्ध करुन दाखवा बघू
आपण स्वत:ला ’क्ष’ मानून क्षण, माणसं, नाती, अवस्था वगैरेनी
गुणून, भागून, बेरजा, वजाबाक्या करून उत्तर सांगा बघू
सोडवा हे सारं शंभर वर्षाच्या आयुष्यात आणि मिळवून दाखवा बरं पैकीत पैकी मार्क
दोन्ही बाजूला समास सोडून नीट रेघा मारा, झाल्यावर पेपर नीट तपासून पहा
महत्वाच्या गोष्टी अधोरेखित करा नि छापील चुका असलेले प्रश्न अटेम्प्ट करा
मी पेपर तुमचा तपासणार नाही, मार्कही देणार नाही
ग्रेडही देणार नाही नि शेराही मारणार नाही
आणि लाल पेनाने काटछाट तर मुळीच करणार नाही
फक्त तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे इतकंच
-वीरेंद्र देशपांडे २००८
मी मेल्यावर
रडतील काही काळ घरची मंडळी
नातेवाईक येऊन भेटून जातील
मित्र येऊन चार गोष्टी सांगून जातील
तो असा होता, तो तसा होता
त्यानंतर क्षणातासानं, दिसामासानं
लोक विसरतच जातील ना मला
पेपरात थोडीच बातमी येणारे
की घरापुढे गर्दी जमणारे
कोणी थोडंच मौन पाळणारे
की कोणी शोकसभा घेणारे
अर्थात हे सारं व्हावं असं मी काहीच केलं नाही
आणि असं व्हावं अशी मुळीच इच्छाही नाही
पण एकदातरी क्षणभरासाठी आठवेन ना मी कुणालातरी
माझ्याविषयी हसावं, रडावं अशी एकतरी आठवण असेल का नाही?
कुणाचंच काही आडत नाही, थांबत नाही
सगळ्यांचं कसं अगदी सुरळीत चाललंय
हे बघितल्यावर फार काही वाटावं असं नाही
आणि काही वाटायला मी तर असणारच नाही
माझ्या अस्थी नदीत विसर्जित केल्यावर
सारे शरीर पंचमहाभूतांमधे विलीन झाल्यावर
कुठेतरी भटकत असलेला माझा आत्मा
परत जन्म घेण्याचा विचार करत असेल फक्त
पण तो माझा आत्मा म्हणायला मी, माझं
अशी कोणतीही संकल्पना तेव्हा निरर्थक झाली असेल
-वीरेंद्र देशपांडे २००८
Tuesday, June 17, 2008
पाऊस
पाऊस हा स्वत: ओलाच असावा
पण त्याला त्याची जाणीव नसावी
तो तर धरणीला बिलगायला आतुर असवा
तिच्या उबदार कुशीत शिरायची ओढ असावी
पण जेव्हा तो बघतो वेडे प्रेमी
त्याचीच वाट पाहताना, चिंब भिजताना
त्याची प्रेयसी धरणीहि त्याचीच वाट बघताना
तेव्हा त्याला कळते पावसात भिजायची मजा काय
म्हणून मग पाऊस सर्वांना भिजवतो
भिजवताना स्वत: मात्र कोरडाच राहत असावा
मग तो उजेड देणारी पणती बघतो
तिच्या खाली मात्र त्याला अंधारच दिसतो
त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळते
आपल्या अस्तित्वाचा अर्थ त्याला कळतो
म्हणुनच तो इतरांसाठी जगतो
म्हणून पाऊस सर्वांना चिंब भिजवतो
-वीरेंद्र देशपांडे २००८
Thursday, May 15, 2008
सकाळ "स्मार्ट सोबती मधे कविता प्रसिद्ध
Sunday, March 23, 2008
चमत्कार!
एकदा झाली गंमत
शाळेच्या दारात आम्हा
चमत्कारी बाबा दिसला
त्याने दिला अंगारा कसला
पण बजवले खाऊ नका
फक्त कपाळी लावा
बाबा गेले झाडाआड
आम्ही दोघे फारच द्वाड
अंगार्याची पुडी केली तोंडात उपडी
मग मात्र झाला खरंच चमत्कार!
आम्ही दोघे झालो अगदीच लहान
फुटांचे गणित इंचात आले
देवाचे जणु मोजमापच् चुकले
मी साडेतीन इंच तो सव्वातीन
दोघे झालो दु:खी दीन
तेवढ्यात आठवले त्या दिवशी होता
हस्तव्यवसायाचा तास
सुचली एक कल्पना झकास
कसेबसे पोचलो वर्गात
आम्ही केली एक होडी
लाल घोटीव कागदाची
आणि एक विमान
निळे मस्त
काय त्याचा थाट
जणू ते जेट
बसून त्यात सफरीला
निघाली आमची जोडी
शाळेच्या गच्चीवरुन
घेतला आम्ही टेकऑफ
उडता-उडता वारा गार
आजूबाजू दिसले पक्षी
तोडल्या थोड्या चिंचा
मग विमानाचे आमच्या
इंधन संपले बहुधा
खाली येता होडी तयार
फुटपाथच्या कडेला
रस्त्याकडेनं वाहणारं पाणी
पाऊस थांबला होता तोवर
सुरु झाली आमची सफर
पेन्सिलिची केली वल्ही
पट्टीने मी पाणी ढकली
कर्कटकाचा झाला नांगर
खोडरबरचे बसवले सीट
वाटेत भेटली वाळली पाने
मुंगळे, किडे अन् झुरळे
चुकवत होतो नाले खड्डे
अडथळे आणि दगडे
जाता रस्ता लागे उतार
नदीकडे जाणार्या पाण्याची धार
काही केल्या होडी थांबेना
दोघेही गेलो घाबरुन
बघता-बघता मिळालो थेट नदीला
पण वाटले समुद्रातच आलो
खूप प्रयत्ने कठाजवळी येता
घेतली आम्ही गटांगळी
नाका-तोंडात गेले पाणी
जिभेवरचा अंगारा निघून जाई
झालो पूर्वीसारखे
पोहोचलो काठावर
घरी सगळं सांगता हे
आई-बाबांसोबत हसले सारे
कुणालाच कसं आमचं बोलणं
खरं वाटत नाही?
-वीरेंद्र देशपांडे २००८
आमच्या वर्गात होती एक...
गोड गुलाबी मुलगी
गोरी-गोरी पान, टपोरे डोळे
दोन-दोन वेण्या, लाल रिबिन
सार्या मुलींचा एकच गणवेश
पांढरा ड्रेस आणि निळा फ्रॉक
त्यातही ती किती छान दिसे
कळे न मजला जादू काय
गोड गुलाबी थंडीतला
तिचा होता एक स्वेटर मऊ
गुलाबी-जांभळा नक्षीदार
आणि लपेटला मफलर लाल
मग पावसाळी हवा येता
तिचा छान गुलाबी रेनकोट
पांढर्या-पिवळ्या फुलांची नक्षी
आणि टोपी लाल-लाल
किंवा असे एक छोटीशी छत्री
तीच मावे त्यात एकटी
छत्री होती गोरी पान
त्यावर होती चित्रे छान
एकदा तर गंमतच झाली
बाईंना गुलाबाची फुले मिळाली
त्यांनी वाटली मुलींना
त्यातले एक मिळले तिला
मैत्रिणिने तिच्या केसात माळले
फारच गोड दिसली तेव्हा
माझ्या स्वप्नातच आली मग
म्हणाली आपण काढू चित्रं
काय सुचेना, काढू का कुत्रं?
मी म्हणालो तू काढ कुत्रं
मी काहीतरी वेगळेच काढेन
मी तिचेच चित्र काढले
आले होते खरंच छान
तिला दखवणार होतो तोच
आईनं उठवलं
छे! मोडलं माझं स्वप्नं
माझा होता वाढदिवस
आईनं छान भांग पाडला
विशेष की मी तो टिकवला
ताईनं नीट पावडर लावली
शर्ट चड्डीत नीट खोचला
रुमालानं नाक नीट पुसलं
कपडे, हात मळू नयेत म्हणून
मी ग्राऊंडवर खेळलोही नाही
सर्वांना वाटली मी चॉकलेटं
तिच्या हातात ठेवताना मात्र
झालो मी लाजेनं पुरता लाल
ती बघतच राहिली टप्पोर्या डोळ्यांनी
-वीरेंद्र देशपांडे २००८
Monday, March 10, 2008
तिहाई!!!
शेवटी हाती काही लागतच नाही
मराठी असो वा हिंदी, मालिका कोणतीही
आमची कथा पुढे, कधी सरकतच नाही
पूर्वी प्रत्येक सिन, तिनदा दाखवला जाई
आता तिहाईचीही करतात तिहाई
पूर्वी एकच पात्र, एकच जोडपं, चालून जाई
आता तेही तीन घेतल्याविना, मालिकाच नाही
कॅमेरा डावीकडून उजवीकडे जाई
तसाच परत उलटा येई
वरुन खाली खालून वर, आणि सतत तिरका जाई
हे तासन्तास बघून आम्हाला चक्कर कशी येत नाही
कौटुंबिक मालिका, आणि रिऍलिटी शो
याशिवाय वेगळं, आता काही दिसतच नाही
चॅनेलवाल्यांची कमाई, घराघरात बघते प्रत्येक बाई
ताई आई आजीबाई, मालिका बघण्यात मग्न होई
अजूनही याला अपवाद आहेत, नाही असं नाही
पण फक्त अपवादापुरतं असणं, फार चांगलं नाही
-वीरेंद्र देशपांडे २००८
Thursday, January 3, 2008
सायंकाळ
विश्वातल्या सर्वांत प्रतिभावंत चित्रकाराने आकाशाच्या कॅनव्हासवर केलेली
रंगांची मनसोक्त उधळण पाहताना
कातरवेळेचा तो स्वप्नवत सोनेरी प्रकाश
पाखरांचे घरट्याकडे परतणारे थवे
पश्चिमेच्या वार्याने जणु फुंकर घालावी
आणि अंगभर एकदम शहारा यावा
तसा सायंकाळचा तो गार वारा
शरीराचा सारा थकवा निघून जावा
मनातल्या सर्व विचारांचे ओझे गळून पडावे
आणि दिवस मावळताना
तो मनाला एक वेगळीच हुरहूर लाऊन जावा
-वीरेंद्र देशपांडे २००५
Wednesday, January 2, 2008
का आता
छाती भरुन घ्यावा मोकळा श्वास
अन् थेट पळंत सुटावं क्षितिजापर्यंत
का आता पळायलाहि होत नाही?
का आता स्वप्नसुध्दा बंधनांच्या
कुबड्या घेऊन खुरडत घुटमळतात
कधी कधी स्वप्नंहि डोक्यावरनं पांघरुण ओढून
गाढ झोपतात
गजराच्या भितीने डोळे घट्ट मिटून घेतात
-वीरेंद्र देशपांडे २००७
बस्स!
प्रेमाचं गुलाबपाणी शिंपडणं
मला तडपवून निघून जाणं
हुरहूर लाऊन रात्ररात्र जागवणं
आता नाही सहन होत असं जिणं
बस्स! आता ठरवलंय एकच गोष्ट करणं
तुला लग्नासाठी मागणी घालणं
-वीरेंद्र देशपांडे २००५

