Monday, December 24, 2007

प्रेमाचे झाड

प्रेमाचे झाड माझे मायेची गं सावली

मी उमदा वृक्ष अन्‌ तू युवा नववेली
तू येता छायेत मी पाने सळसळली

पावसात झालो चिंब वसंतात काया बहरली
अन्‌ मग पाने गाळून थोडी शांतता अनुभवली

सावलीतल्या कवडश्यांनी मी किती चित्रे रंगवली
सांकेतिक भाषेत तुज प्रेमाची साद घातली

माहेरच्या मातीस तू घट्ट होतीस बांधली
माझी मुळे मात्र तुझ्या दिशेने फोफावली

सारे समजून वार्‍यानेहि आपुली दिशा बदलली
तुझा गंध घेऊन त्याची झुळूक आली

पावसात जेव्हा भिजता काया तुझी ओली
तुला बिलगण्याची आस मज लागली

हिरवीगार कांती तुझी कोवळ्या पानांनी झाकली
पिवळी फुले माळून नववधूसवे तू नटली

पण तव मज प्रेमाची खात्री नाही पटली
आणि आपल्या मीलनाची सनई कधीच नाही वाजली

पण म्हणून मी माझी पाने नाही गाळली
मला ठाव माझे काम की पांथस्थांना देणे सावली

मज कळले यातून एक चांगली गोष्ट घडली
माझ्या सावलीत बसून पांथस्थांनी तुझे रुप तुझी फुलेच पाहिली

-वीरेंद्र देशपांडे २००७

एक कविता...

एक कविता...
उत्कट
ओघवती
साधी-सोपी

तर दुसरी कविता...
शब्दबंबाळ
दिवाळी अंकासाठी पाठवायची म्हणून केवळ,
पाय मोडलेले शब्द आणि मन पिळून काढलेल्या भावना एकत्र ठासून कोंबलेली

एक कविता...
आशयपूर्ण
सुंदर अभिव्यक्ती
आधी मनाला भावलेली, मग लिहिलेली

तर दुसरी कविता...
स्वत:लाही काय केलंय, कळंत नसावं अश्या एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट फटकार्‍यासारखी
क्लिष्ट शब्द शोधून काढून, नुसते एकापुढं एक ठेवलेली
प्रायोगिक नाटकातल्या एखाद्या लांबलचक मोनोलॉग सारखी लिहिलेली

एक कविता...
पहिल्या वाचनात मनाचा ठाव घेणारी
परत-परत वाचताना अर्थाचे एकेक पदर उलगडत जाणारी
जितके वेळा वाचू तितकी मनावर खोल-खोल कोरली जाणारी

-वीरेंद्र देशपांडे २००७

क्षणात दूर...

पहटेला टेकलेली रात्र
स्वप्नांची चुळबुळ
भावनांचे पूर
कोंदलेले श्वास
मुके शब्द
पिचलेलं मन
भिजलेली मति
धडधडणारी छाती
थडथडणारी नस
त्यात वाहणारं शिळं रक्तं
अंधारात चाचपडताना जखमा
परत परत चिघळणार्‍या
आत उन्मत्त वादळं
चिरा गेल्या
भिंती कोसळल्या
क्षणात दूर फेकल्या गेल्या

-वीरेंद्र देशपांडे २००७

मेट्रोकर

गर्दी घाण अन्‌ प्रदूषण सवयीनं विसरु लागलोय
अहो हवेत ऑक्सिजन असतो हेच मुळात विसरु लागलोय
सगळीकडच्या गलिच्छ्तेकडे दुर्लक्ष करु लागलोय
अन्‌ मीहि त्यात आपली भर घालू लागलोय
आता मी थोडा-थोडा मेट्रोकर होऊ लागलोय

हरघडी पैसा वेळ अन्‌ प्रवास याचीच कटकट करु लागलोय
मित्राचा फोन येता कामापुरतं बोलून लगेच कट करु लागलोय
निवांत वेळ मिळता सुध्दा वेळेची अन्‌ पैशाची गणितं करु लागलोय
सगळा हिशोब बरोबर जुळुनही निश्चिंत व्हायला घाबरु लागलोय
आता मी थोडा-थोडा मेट्रोकर होऊ लागलोय

जवळचे कुणी भेटता त्याच्यापेक्षा त्याच्या मोबाईलचीच चौकशी करु लागलोय
विचारांची देवाण-घेवाण दूरच केवळ एस्‌. एम्‌. एस्‌. व रिंगटोनपुरताच मर्यादित राहू लागलोय
हे जग फार सुंदर आहे वगैरे-वगैरे कधीच विसरुन गेलोय
हे सारे आपल्याला फसवायलाच बसलेत या निष्कर्षावर आलोय
आता मी थोडा-थोडा मेट्रोकर होऊ लागलोय

रोज उठून ऑफिस नि घर असा धावू लागलोय
करिअरच्या नावाखाली सारंकाही ओवाळून टाकू लागलोय
आपला गाव विसरुन शहरात सेटल व्हायच्या गोष्टी करु लागलोय
हळूहळू त्या गर्दीतलाच एक ठिपका होऊ लागलोय
आता मी थोडा-थोडा मेट्रोकर होऊ लागलोय

जीवनाच्या या ट्रॅकवर फास्ट ट्रेनसारखा नॉन्‌स्टॉप धावू लागलोय
पुढे धावता-धावता जवळच्या लोकांनाही मागे विसरु लागलोय
माफ करा मेट्रोकरांनो तुमचा दोष नाही
पण काय करु? आता मीहि थोडा-थोडा मेट्रोकर होऊ लागलोय

-वीरेंद्र देशपांडे २००६

मी असंच गातो!

मी वाद्यं बडवतो, वेडावाकडा गातो
लागत नाहीत सूर, लागत नाही बाथरुम

ही शार्प की ती फ्लॅट कळत नाही मला
काळी पांढरी पट्टी समजत नाही मला
ताना आलाप वगैरे सरळ सोडून देतो
आवाज सोडून बाकी संपूर्ण हलतो

स्केल मायनर की मेजर, झेपत नाही मला
मंद्र मध्यम तार, डोक्यावरुन जातं फार
राग येत नाहीत, म्हणून राग येतो
म्हणून मग मी फक्त, माझ्यासाठीच गातो

-वीरेंद्र देशपांडे २००७

माझी मलाच...

आता नाही सकाळी उठून एकटाच फिरायला जात
आणि नाही रात्री पुलावर जाऊन नुसताच बसत
आता नाही खाली डोकावून बघत खिडकीतून
आणि नाही गालावर हात ठेवून नुसताच बघत गॅलरीतून
आता नाही छान पावसाळ्यात मी बाहेर पडत
आणि नाही गुलाबी थंडीत बाहेर जाण्या स्वेटर अडकवत
आता नाही फार वेळ नुसता पुस्तक वाचत बसत
आणि नाही जास्त वेळ नुसतीच गाणी ऐकत बसत
आता नाही जात मी गार वार्‍‌‍याचा कुठे
आणि नाही फिरत मी भर उन्हाचा कुठे
आता नाही रमत मी कालच्या दिवसांत
आणि नाही ठरवत मी उद्यासाठी काहीच
आता नाही, मी एकटा रहातच नाही
आणि नाही, एकटं रहावतच नाही
आता माझी मलाच भिती वाटते, माझी मलाच काळजी वाटते

-वीरेंद्र देशपांडे २००७

एक उनाड वर्किंग डे

आज काय चालू आहे?
ऑफिसला येतो, मेल चेक करतो, ब्रेकफास्ट करतो
मित्राची भुणभुण, तिचा विचार, आणि भरपूर काम
डोळे चोळतो, चहा घेऊन येतो, मग सांगतो
परत मेल बघतो, ऑर्कुट-ऑर्कुट खेळतो, कामाला कंटाळतो
लंच करतो, बडिशेप खातो, एक फेरी मारतो
कंटाळण्याची प्रॅक्टिस, तो लपवण्याची प्रॅक्टिस, परत एक चहा
मेसेंजर मिनिमाइज करुन काम करण्याची ऍक्टिंग, झोपलेले असून सुद्धा
एक मिस्ड्‌ कॉल, नंबर स्टोअर नसलेला, परत आला की उचलायचाच्‌
थोडी भूक लागते, अर्धा कोरडा सँडविच खातो, पाणी पितो
सिरीयसली कामाला लागतो, घड्याळाकडे बघतो, बॅग उचलतो

-वीरेंद्र देशपांडे २००७

अंजिरी रंगाची साडी

एकदा माझ्यासाठी ती अंजिरी रंगाची साडी नेस
मोगर्‍याचा गजरा घालून माझ्यासमोर बस
मला माहितीये तू काही बोलणार नाहीस
पण एकदा तरी माझ्याकडे बघून हास

काळे भोर तुझे केस
जेव्हा सावरतेस खूप गोड दिसतेस
काय सांगू त्यावेळची तुझी ग्रेस
एकदा माझ्यासाठी ती अंजिरी रंगाची साडी नेस

तुला माहितीये माझे तुझ्यावरले
आणि तुझे माझ्यावरले प्रेम
मग का अशी झुरतेस
एकदा माझ्यासाठी ती अंजिरी रंगाची साडी नेस

एके संध्याकाळी सूर्य बुडताना माझ्यासमोर बस
तशीच चांदणं पडेपर्यंत बस
आणि हातात हात देऊन फक्त हास
एकदा माझ्यासाठी ती अंजिरी रंगाची साडी नेस

-वीरेंद्र देशपांडे २००७

रंगबहारी सांजवेळा

झाडांचा हिरवा झाला काळा
डोंगररांगांचा होय जांभळा
आकाशी सडा निळा जांभळा
ती रंगबहारी सांजवेळा

डोळ्यांचा काळा पापण्यांचा जांभळा
गाल गुलाबी ओठ अंजिरी
लावित होते लळा
ती रंगबहारी सांजवेळा

केसांची बट येई डोळा
गालावरला प्रकाश कोवळा
मज वाटे तांबूस निळा
ती रंगबहारी सांजवेळा

-वीरेंद्र देशपांडे २००७

ओली भेळ

मी, माझी मैत्रिण, अन्‌ एक ओली भेळ
कांदा कोथिंबिर टाकलेली, संध्याकाळची वेळ

तिला नसतोच कधी, इतका मोकळा वेळ
अन्‌ माझ्यावर कधी, येतच नाही अशी वेळ

गोड कि तिखट, ठरवायला एवढा वेळ
शेवटी सांगितली, एक मिडियम भेळ

नाही-नाही म्हणता-म्हणता, तिनं घेतली थोडी भेळ
तिला पाहता-पाहता, झरझर निसटली वेळ

जाग आली तेव्हा जेव्हा म्हणाली तूहि घे ना भेळ
तिला एकटक बघत होतो मी बराच वेळ

बोलली नाही फार, पण खाल्ली ना तिनं भेळ
मलाहि तिला, द्यायला हवा थोडा वेळ

नंतर फार आठवली ती एकत्र खाल्लेली भेळ
वाटलं कि परत का येत नाही ती वेळ

शेवटी फोन करुन विचारले, येणार का खायला भेळ
आश्चर्यच खरं, तिनं काढलाच थोड वेळ

गोड तिखट कि मिडियम, अशी समजायला सोपी असते भेळ
मनाचे मात्र काही, समजत नाहीत खेळ

नंतर परत-परत, येतच गेली अशी वेळ
न बोलता सुध्दा, काहीतरी झाला मेळ

अजूनहि आम्ही, एकत्र खातो ती भेळ
या सगळ्याचे श्रेय मात्र, ती ओली भेळ

-वीरेंद्र देशपांडे २००७

पुणं

पुणं म्हणजे, पुणं म्हणजे, पक्कं पुणं असतं
मनसोक्त जगलेलं खर्‍या अर्थाचं जिणं असतं
मनाच्या कोपर्‍यात पंचेंद्रियांच्या अनुभूतीतून
कोरलं गेलेलं सुंदर असं लेणं असतं

_वीरेंद्र देशपांडे २००७

तो एक वेडा

तो एक वेडा गाऊन गेला
अवसेला पूर्णचंद्र उगवून गेला

आठवणींना उकरुन गेला
कवितेच्या ओळी बिखरुन गेला
जे बोलणे ते मात्र राहून गेला
तो एक वेडा गाऊन गेला

प्रेमाचा धागा उसवून गेला
मनाची घडी मोडून गेला
रडायचे तेवढे ठेवून गेला
तो एक वेडा गाऊन गेला

जे द्यायचे सर्व देऊन गेला
जे घ्यायचे तेहि ठेवून गेला
स्वत:साठी मागणे राहून गेला
तो एक वेडा गाऊन गेला

मनी ह्रदयी बीज पेरुन गेला
मग त्याचाच अंकुर होऊन गेला
मेघ होऊनी बरसून गेला
तो एक वेडा गाऊन गेला

दु:ख गटागट पिऊन गेला
सुखाचा चोथा ठेवून गेला
धुक्यात अकस्मात विरुन गेला
तो एक वेडा गाऊन गेला

_वीरेंद्र देशपांडे २००७

वर्ककल्चर

वर्ककल्चर, वर्ककल्चर म्हणजे वर्ककल्चर असतं
तुमचं आमचं बनलेलं खेचर असतं
मागं सतत हंटर असतं
आणि पुढं लठ्ठं पगाराचं गाजर असतं

_वीरेंद्र देशपांडे २००७

तेच-तेच

उठता-बसता दिवस-रात्र पुन्हा-पुन्हा तेच-तेच
सुख-दु:ख मन-बुध्दी सारं काही ठेच-ठेच

पहाट होते गजर वाजतो माणूस उठतो कामाला लागतो
दाढी करतो आंघोळ करतो कपडे करतो बाहेर पडतो

तीच बस तीच ट्रेन तीच खिडकी तीच स्टेशनं
तेच ऑफिस तेच टेबल तेच काम तोच बॉस

फाईलचे गठ्ठे मारायचे शिक्के बॉसचे बुक्के तेच-तेच
डब्यातली भाजी जोकमधला सरदारजी चारची भजी तीच-तीच

चाळीतले मित्र शेजार्‍यांचं कुत्रं गावाकडचं पत्रं तेच-तेच
येताना फुटाणे तिकीट चार रुपये आठ आणे रोज असेच येणे तेच-तेच

-वीरेंद्र देशपांडे २००७

जस्ट!

आता आमच्या मधे
जस्ट एक फरक आहे
ती जस्ट मॅरीड
आणि मी जस्ट फ्रेंड आहे

-वीरेंद्र देशपांडे २००७

मी जगतो...

मी जगतो...
कधी स्वत:च्याच मागं लपतो
मनात खोल दडतो
कधी स्वत:तच

मी लपतो...
कधी कणसाच्या दाण्यात
बुजगावण्यात
कधी चिमणीच्या चोचीत

मी रमतो...
कधी बांबूच्या बेटात
गार-गार वार्‍यात
कधी तळ्यातल्या पाण्यात

मी लपतो...
कधी अंगणातल्या तुळशीमागं
आईच्या केसातल्या गजर्‍यात
कधी देव्हार्‍यात

मी दडतो...
कधी बैलांच्या गळ्यातल्या घुंगरात
गवताच्या गंजीत
कधी वेशीच्या हललेल्या दगडात

मी लपतो...कधी
आभाळाखाली
आभाळाच्या पाठीमागे
कधी आभाळाच्याच कुशीत

मी विरतो...
कधी ढगांच्या कापसात
विजेच्या रेषेमागं
कधी इंद्रधनुच्या रंगांत

मी जगतो...
कधी खवळलेल्या दर्यात
उन्मत्त वादळात
नावाड्याच्या प्राण आलेल्या कंठात

मी असतो...
कधी दवबिंदूंचा हार माळलेल्या फुलात
फुलपाखराच्या पंखांत
कधी गोड-गोड मधात

मी नसतो...
कधी दूर-दूर जाणार्‍या सुन्न वाटेवर
ढळलेल्या वार्‍यात
ओंजळीत श्वास कोंदलेल्या फुलांत

मी रमतो....
कधी कवितेच्या पानात
प्रेयसीच्या मनात
कधी एखाद्या सुंदर चित्रातल्या वनात

-वीरेंद्र देशपांडे २००६

सखे का?

सखे का भेटलीस आयुष्याच्या त्या वळणावर
जर चालायचेच नव्हते दोन पावलंहि बरोबर

सखे का दिलास माझ्या हातात तुझा हात
जो आयुष्यभरासाठी कधीच माझ्या हाती देणार नव्हतीस

सखे का तुझ्या डोळ्यात दाखवलीस ती स्वप्नं
जी आकार घेण्यापूर्वीच विरुन गेली

आणि निघून गेलीस एक दिवस माझं सर्वस्व घेऊन
कारण तोपर्यंत तूच माझं सर्वस्व झाली होतीस

-वीरेंद्र देशपांडे २००५

सहप्रवासी

जीवनाचा रस्ता
तुडवित निघायचे
मागे वळून
नाही बघायचे

जशी दु:खाची वाटचाल
तशी सुखाची चाहूल
सावरत चालायचे
दिस मोजित जायचे

एकेक क्षण वेचित
आठवणी साठवित
वळण घेत रहायचे

ऊन प्रखर फार
सावलीचाच आधार
थोडा विसावा घेत-घेत
पुढे निघायचे

खड्ड्या खुड्ड्यात तोल सांभाळत
ठेच लागता सावरायला
हात शोधत नाही थांबायचे

आली मोठी वर्षा सर
सारा-सारा चिखल-चिखल
रुतला पाय निघेना
हिंमत नाही हरायचे

जीवनाचा रस्ता
एकट्यालाच तुडवायचा असतो
मग आपणच आपुले
सहप्रवासी व्हायचे

-वीरेंद्र देशपांडे २००५

हे जीवन

हे जीवन सारी माया असे
खरे कुणा ठाव नसे
कधी गुलाबाची नाजूक कळी दिसे
कधी जोरानं काटा घुसे

-वीरेंद्र देशपांडे २००५