Monday, August 25, 2008

तो निघे हिंदवी राजा

अर्पून स्वत:च्या माना
मिटविण्या जुन्या अपमाना
घेऊन नभाशी पैजा
तो निघे हिंदवी राजा

मुठभर सैनिक साठ
शिलेदार खास आठ
रणकंदन ते शत्रूचे
तांडव केवळ म्रुत्यूचे
स्तब्ध तयाचा श्वास
अचूक लक्ष्य वेधत
घुसती भाले खडगे
ढालींचे पडती तुकडे
घेऊन घोट नरडीचा
तो सडा पडे रक्ताचा
छातीत खुपसुनी भाला
छाटून हाता पायाला
घालून माळ मुंडक्यांची
लाऊन रास प्रेतांची

ती थंड हवा फुफुसात
अन तडफड काळजात
बाणांनी नभ झाकोळी
रक्ताला येई उकळी
जरी बाहेर ये कोथळा
म्रुत्यूचा सुंदर सोहळा
भय पकड न घे मनाची
उमटे रेष हास्याची
ज्यां रक्त पाण्यासम स्वस्त
ढोसून जाहले मस्त
त्या उन्मत्त हत्तीला
अंकुश ज्यांनी लाविला
मस्तके रणी अर्पून
रक्ते अभिषेक करुन
सर्वस्व ज्यांनी त्यजून
मात्रुभूमीला पुजून

कधी न हार मानणे
कधी न शरण जाणे
रणांगणी रक्त सांडणे
देशसेवे प्राण देणे
प्रजेसाठी, मुलांसाठी
न्याय, स्वातंत्र्यासाठी
तत्व, कारणांसाठी
एका वेड्या आशेसाठी
त्वां शौर्य आम्हा संघटे
त्वां कर्त्रुत्वे आम्हा बळ ये
पुढल्या अगणित शतकात
कुणी स्वतंत्र ये मातीत
विसरुन स्वत:च्या व्यथा
हे दगड सांगतील कथा
त्या शूरवीरांच्या गाथा
अभिमाने उंच हो माथा


- वीरेंद्र देशपांडे २००८

2 comments:

गणेशा... said...

kavita aani tyatil shabd khupch chan aahet
bestone

नाम गुम जायेगा said...

vaah विरेन्द्र...
जबरदस्त फ़्लो. ताकदवान आशय... मजा आली वाचायला...
ऐकायला तर नक्कीच अजून मजा येईल.