Sunday, February 21, 2010

आठवणी

उन्हाळा नुकताच जाणवायला लागला होता. रविवारी दुपारी घराच्यापुढच्या पायर्‍यांवर मी एकटाच बसलो होतो. उन्हं अजून पूर्ण उतरली नव्हती आणि संध्याकाळ व्हायला अजून बराच वेळ होता. समोरच्या भिंतींवर चिमण्या नाचत होत्या, बाकी शांतता होती. मधेच वार्‍याची हलकी झुळुक येत होती. बागेतल्या फुलांचा मंद सुगंध पसरलेला होता. थोड्या वेळाने उन्हं उतरणार होती. छान गार वारा सुटणार होता. संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही ठरलेल्या ठिकाणी भेटणार होतो. पण का कोण जाणे आज ती भेटल्यावरही तिच्या आठवणीच दाटून येत होत्या. मग मधेच दूरवर परतणारे पक्ष्यांचे थवे दिसत होते. तर मधे गडद होत चाललेले मावळतीचे रंग नुसता बघत बसलो होतो मी. त्यातंच आठवत होता तिचा चेहरा, बट सावरण्याची तिची लकब, तिचे बोलके डोळे, तिचं हसणं, तिचा स्पर्श, तिचं बोलणं, तिचं वागणं. तिचं माझ्याबरोबर असणं मी पुरता विसरलो होतो आणि हे सारं आठवून मनोमन गोड हसत होतो. आल्यापासून मी एक अक्षरही बोललो नव्हतो तिच्याशी. तेवढ्यात मागवलेला चहा आला आणि चहाचा गरम कप ओठाला लावल्यावर मी शहारलोच. उगीच काहीतरी वाटून गेल्याने मी गालातल्या गालात हसलो. तिला माझं हे काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं, कदाचित मलाही...पण आज तिच्यापेक्षा तिच्या आठवणीच सुंदर वाटत होत्या.

- वीरेंद्र देशपांडे २१/०२/२०१०

6 comments:

हेरंब said...

मस्तच.. खूप छान..

साधक said...

शेवटचं वाक्य अगदी समर्पक. मस्त.

अपर्णा said...

sahi...khupach sundar....

bakul said...

मस्त........ छान..

Harshad Godbole said...

मस्त...
गद्य पद्याच्या सीमेवरच्या no words land मधला अनुभव आहे.

Veerendra said...

वा खुपच मस्त