Tuesday, April 6, 2010

दोन तास

नारायण सुर्वे यांची माफी मागून, त्यांच्या ’दोन दिवस’ या कवितेच्या *वजनात हे एक विडंबन.

ज्यांना कविता माहीत नाही त्यांनी ती अगोदर वाचून घ्यावी:

दोन दिवस - नारायण सुर्वे

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
-------------------------------------------
दोन तास

दोन तास जीम करण्यात गेले दोन कोमात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेय पोटावर चरबी

शेकडो वेळा वॉर्मअप केले, जीम केले, कार्डिओ झाले
फिटनेसचा मंत्र शोधण्यातच एनर्जी बर्बाद झाली

हे स्नायू माझे सर्वस्व, इन्स्ट्रक्टरकडे गहाणच राहिले
कधी स्नायू फुगलेले, कधी शिथील झालेले पाहिले

हरघडी घाम वाळविला नाही; पण असाही क्षण आला
तेव्हा घामच मित्र होऊन साहाय्यास धावून आला

प्रोटीनचा आहार हरघडी केला अगा जाडसर झालो
वजन पेलावे कसे, पुन्हा रोडावे कसे, हेच जिममधे शिकलो

दिवसरात्र ओढावा कोलू तसे शरीर प्राण थकले
दोन तास जीम करण्यात गेले दोन कोमात गेले

- वीरेंद्र देशपांडे ०६/०४/२०१०

*तळटीप: वर वापरलेला वजन हा शब्द केवळ कवितेच्या व्याकरणा संदर्भात आहे.

1 comments:

यशवंत कुलकर्णी said...

मस्त विडंबन आहे..!
अहो या ब्लॊगिंगमुळे जिमींगचे पार बारा वाजतात...तेही लिहायला हवे होते..