Sunday, April 25, 2010

कृष्ण-सोंगाड्या

सोंगाड्या: कृष्णदेवा, गावात एक भी गवळण ऍव्हलेबल न्हाई.
कृष्ण: कुठे गेल्या बरे सगळ्या? संध्याकाळच्या वेळी एकही गवळण दिसत नाही?
सोंगाड्या: कृष्णदेवा, समद्या गवळणी ऑफिसात गेल्यात. राधा गौळण एका कॉलसेंटर कंपनीत, सुपरवायझरे. ललिता, विशाखा, चंद्रा, सुंद्रा, श्यामा, भामा समद्या कॉलसेंटर मधे नोकरीला लागल्यात, अन् समद्या कष्टंबर कॉल अटेंड करतात.
कृष्ण: कुठे?
सोंगाड्या: चिंचेवाडीत. अन् बाकीच्या थराडी का कुठं ते जात्यात.
कृष्ण: अरे पण आता संध्याकाळ झाली त्यांची परतण्याची वेळ झाली असेल.
सोंगाड्या: कृष्णदेवा, त्या समद्या सेकंड शिफ्ट करतात. दुपारी जातात अन् रात्री उशीरा येतात.
कृष्ण: आणि मग त्यांचे नवरे? ते काय करतात?
सोंगाड्या: ते सगळे आयटीत आहेत.
कृष्ण: म्हणजे? नुसते ऐटीत बसून खातात? आणि बायकांना कामाला जायला लावतात?
सोंगाड्या: तसं नव्हे कृष्णदेवा. आयटी म्हणजे, "इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी". ते समदे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते भी बारा-बारा तास काम करतात. बायका सकाळी स्वयपाक करुन मुलाला पाळणा घरात सोडून जातात. नवरे संध्याकाळी येताना मुलाला घेऊन येतात व रात्रीचा स्वयपाक करतात.
कृष्ण: मग आता या गवळणी कधी भेटणार?
सोंगाड्या: पॅनिक होऊ नका कृष्णदेवा. आपण त्यांना वीकेंड ला गाठू.
कृष्ण: वीकेंड म्हणजे काय?
सोंगाड्या: अरे अरे कृष्णदेवा! तुमचं जनरल नॉलेज फारच सामान्य दिसतंय. तुम्ही कलियुगात अवतार घेण्याआधी सांदिपनी रुषिंच्या आश्रमात ट्रेनिंग घ्यायला गेला होता ना? सांदिपनी रुषिंनी तुम्हाला लेटेस्ट हॅपनिंग काहीच शिकवलं नाही वाटतं? वीकेंड म्हणजे आठवड्याचा शेवट, शनिवार-रविवार. त्याच दिवशी या मंडळींना सुट्टी असते. त्यामुळेच मी म्हटलं की, गौळणींना भेटायला तुम्हाला वीकेंडपर्यंत वाट पहावी लागणार.
कृष्ण: अरे, असा धीर सोडू नकोस! मी मुरली वाजवितो.
सोंगाड्या: बासरीची आडिओ क्वालिटी पॉलिफोनिक आहे का एम्पीथ्री?
कृष्ण: आम्ही समजलो नाही.
सोंगाड्या: कृष्णदेवा, तुम्हाला असल्या मेट्रोसिटीत राहायचं असंल तर तुमचं नॉलेज अपटुडेट ठेवायला हवं. जाऊ दे, तुम्ही वाजवा बासरी.

(कृष्ण बासरी वाजवितो.)

कृष्ण: एकदेखील गवळण आली नाही?
सोंगाड्या: मेंढी. ती बघा मेंढी आली. अन् बघा तो धनगर आपल्या मेंढ्या चरायला घेऊन येतोय.

काखंमंदी लॅपट्वाप वळचणीला मॉबाईल
मुखी तुझं नाव सदा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी

मोबाईल नि लॅपट्वाप घेऊ द्या की रं
मला भि आयटीत येऊ द्या की रं
व्हिसा नि पासपोर्ट घेऊ द्या की रं
मला भि युएस् ला जाऊ द्या की रं

कृष्ण: हे लोकसंगीत फार वेगळे वाटते आहे.
सोंगाड्या: हे लोकल संगीत.
कृष्ण: लोकल संगीत नव्हे लोकसंगीत
सोंगाड्या: कृष्णदेवा, लोकसंगीत एका प्रकारे लोकल संगीतच आहे. आणि आज ग्लोबलायझेशनच्या जमान्यात प्रत्येक लोकल गोष्ट ग्लोबल होत आहे. तशात हे लोकल संगीत ग्लोबल झाल्याशिवाय कसं राहील?
कृष्ण: पण अजून एकही गवळण आली नाही.
सोंगाड्या: कृष्णदेवा, मी सांगतो तसे करा. तुमच्या मॉबाईल मधली एखादी रिंगटोन वाजवा.

सिर पटक पटक के कह रहा है तू भी जा
मेरे पास तू न आ, जिंदगी से चली जा

सोंगाड्या: रिडिक्युलस! थांबवा ते.
कृष्ण: पण रिडिक्युलस म्हणजे काय?
सोंगाड्या: अरे अरे, कृष्णदेवा! तुम्ही ते इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मधे जायचं सोडून सांदिपनी रुषींच्या आश्रमात गेलात ना त्याचाच हा दुष्परिणाम. रिडिक्युलस या शब्दाचा संधी विग्रह, "रेडा + किळस = रिडिक्युलस" असा आहे.
कृष्ण: ती बघ! ती कोण येते आहे? चंद्राच ती. थांबव तिला.
सोंगाड्या: थांबा चंद्राबाई.
चंद्रा: शी! तुम्ही एटिकेट्स वगैरे कधी शिकला नाहीत का?
(सोंगाड्या कृष्णाकडे बोट दाखवतो)
कृष्ण: एटिकेट्स! पण आम्ही तर कायम एटिकेटीवरच शिकत आलो आहोत.
सोंगाड्या: कृष्णदेवा, ते एटिकेटी वेगळं आणि एटिकेट्स वेगळे.
कृष्ण: असो. तुम्ही कुठं मथुरेच्या बाजाराला निघालात वाटतं.
चंद्रा: मथुरेचा बाजार? नाही काही, मथुरा शॉपिंग मॉल.
कृष्ण: मथुरा शॉपिंग मॉल?
सोंगाड्या: कृष्णदेवा, मथुरा शॉपिंग मॉल म्हणजे एका अर्थी मथुरेचा बाजारच नाही का? पण मग तुम्ही ऑफिसला नाही जात का?
चंद्रा: नाही. मी माझं ऑफिसचं काम नेटनेच करते.
कृष्ण: वा! किती नेटाने काम करते, बघितलेस?
सोंगाड्या: कृष्णदेवा, नेटाने न्हाई. त्या नेटने म्हणजे इंटरनेटने आपले काम करतात.
चंद्रा: अय्या मला लवकर जायला हवं. नाहीतर सगळ डेटा करपेल.
सोंगाड्या: काय?
चंद्रा: अहो परवा चुकून नेट जास्त वेळ चालू राहिलं तर सगळा डेटा करपला. मी जाते...
कृष्ण: बाकीच्या गवळणी कुठे आहेत? अता तरी त्यांची ऑफिसं सुटली असतील.
सोंगाड्या: ते खरं आहे कृष्णदेवा. पण इथले रस्ते आणि ट्राफिक...

खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे

सोंगाड्या: त्यामुळे त्यांना परत यायला अजून बराच वेळ आहे. तोवर तुम्ही आपली गीतेची सीडी लावा.
कृष्ण: गीतेची सीडी?
सोंगाड्या: बरोबर! तुम्हाला ठाऊक नसेल कृष्णदेवा. नुकतेच एका इतिहास संशोधकाच्या मते, द्वापरयुगात झालेल्या कौरव पांडव युध्दात आपण अर्जुनाला ऐकविलेली गीता ही वास्तविक तुमच्या करंगळीत कायम फिरणार्‍या सीडीत लिहिलेली होती. ज्याला आपण आजपर्यंत "सुदर्शन चक्र" या नावाने ओळखत होतो आणि ही गीता आपण इंटरनेटवरुन एम्पीथ्री डाऊनलोड करुन आपल्या सीडी वर लिहून ठेवली व मग अर्जुनाला ती ऐकवली. त्यांनी त्या सीडी चे पुरावे मिळाल्याचा दावा केला आहे. तेव्हा, ती सीडी लावा, तोवर आपण थोडी विश्रांती घेऊ.

- वीरेंद्र देशपांडे २५/०४/२०१०

1 comments:

Devendra Deshpande said...

सहीच! सुदर्शन सीडीची व्हॉट ऍन आयडिया सरजी!