"लहानपण देगा देवा" असं बरेचदा कानावर पडतं. पण मला मात्र असं काही वाटत नाही त्याला कारण माझा शालेय जीवनाचा खडतर काळ असावा. गेल्याच आठवड्यात आमच्या बॅचचे शाळेत गेट-टुगेदर होते. आमच्या तुकडीचा वर्ग शोधायला गेलो आणि चमकलोच. वर्गांवर अ,ब,क ऐवजी येलो होऊस, ऑरेंज हाऊस, रेड हाऊस अश्या पाट्या होत्या. आमच्या वेळी शाळेत असली कुठलीच हौस नव्हती. संपूर्ण शालेय जीवनात नाही म्हणायला, बालवाडी ते दुसरी त्यातल्या त्यात सुखकर. बालवाडीत असताना, ब्रेडचे तुकडे करुन देणे, दाणे सोलून व बारीक करुन देणे, भेंडीचे काप घेऊन त्याचे ठसे कागदावर उमटवणे, कागदावर सुई-दोर्याने शिवणकाम करणे, जंगलजीम वर खेळणे असा छान छान अभ्यास होता. पुढे प्राथमिक शाळेत गेल्यावरही नाट्यशिबिर, जादूचे प्रयोग अश्या कितीतरी चांगल्या गोष्टी शाळेने केल्या. स्नेहसंमेलनात नाच, गणेशोत्सवात मातीचे छोटे गणपती तयार करुन ते रंगवणे. मातकामाच्या वर्गात चिकण मातीपासून वांगं, मिरची वगैरे तयार करणे, पालखीच्या दिवशी छोट्या पालख्या तयार करुन वारकर्यांच्या वेशात पालखी काढणे असे अनेक सुंदर क्षण शाळेने दिले. पण जसजशी ३री ची सहामाही परीक्षा उलटली तसतसे अभ्यासाला स्पर्धेचे वातावरण येऊ लागले. आणि बाकी कशापेक्षाही अभ्यासात मिळालेल्या मार्कांना अनन्यसाधारण महत्व येऊ लागले. चौथीत अ वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी धडपड. पाचवीला चांगल्या हायस्कूलमधे ऐडमिशन मिळविण्यासाठी चुरस. आमच्या शाळेच्या ग्राऊंडवरच्या झाडावर भुतं राहतात असं मी कुणाकडून तरी ऐकलं होतं. त्यामुळे मी त्या झाडाच्या आसपास फिरकत सुध्दा नसे. पण वर्गात नेहमी खाली मान घालून बसणार्या माझ्या मानगुटावर "अभ्यास" नामक भूत कधी बसलं हे काही समजलंच नाही.
प्राथमिक शाळेत "या कुन्देन्दुतुषारहार धवला" हा श्लोक आम्ही प्रार्थना म्हणून म्हणत असू. त्यातलं बाकी सर्व विसरुन "नि:षेश जाड्या पहा" इतकंच काय ते आता माझ्या लक्षात आहे. आम्ही काही टवाळ मुलं, प्रार्थनेसाठी मिटलेले डोळे हळूच उघडून "नि:षेश जाड्या पहा" असं म्हणून आमच्या वर्गातल्या जाड्या मुलाकडे बघून एकमेकांकडे बघून हासत असू.
शनिवारी सकाळी लवकर उठून शाळेला येऊन भीमरुपी म्हणताना कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे ऐवजी "झोपावे उत्तरेकडे" हे अगदी मनापासून वाटत असे. त्या वयात मी खूप हुंदडायचो. संध्याकाळी खेळून दमून आल्यावर, ग्रुहपाठ करायला बसलो की, कंटाळा करायचो. आई नेहमी म्हणायची, दिवस गेला उठारेठी अन् चांदण्यांखाली कापूस वेची. त्या वयात देखिल "छडी लागे छमछम विद्या येई घमघम" हे गाणं मला कधीही आवडलं नाही तुम्हाला सांगतो. अहो छडीच्या तालावर खेळ करुन दाखवायला आम्ही काय सर्कशीतले प्राणी होतो का?
मी कितीही लपवलं तरी माझ्या नावावरुन मी माझ्या हुशार भावाचा धाकटा भाऊ आहे हे सर्व शिक्षक ओळखायचे. तोही त्याच शाळेचा विद्यार्थी. तो हुशार, कायम पहिला येणारा आणि मी त्याचा धाकटा भाऊ मात्र सामान्य बुध्दीचा. या कारणास्तव मी शिक्षकांचा खूप मार आणि मानसिक छळ सहन केलाय. माझ्या बुध्दीनुसार उत्तम मार्क मिळवूनही माझे कधीही कुणी कौतुक केल्याचे मला स्मरत नाही. ५वीत असताना माझा वर्गात सहावा नंबर आला होता. इयत्तेतला आमचा सर्वांत हुशार वर्ग. त्यामुळे वर्गात सहावा नंबर येणं ही माझ्यासाठी खूप मोठं यश होतं. पण आमच्या तत्कालीन वर्गप्रमुख बाईंनी मला स्टाफ रुम मधे बोलावून तुझ्याकडून पहिला नंबर येण्याची अपेक्षा होती हे सांगून मला चांगलेच झाडले होते. त्यातून आमच्या वर्गातल्या एका हुशार मुलाने माझा सहावा नंबर मेहनत हुशारीने नसून मला चित्रकलेत मिळालेले भरपूर मार्क आहेत हे सांगितले. तू चित्रकलेच्या जोरावर अत्ता चांगले मार्क मिळवशील, पण सातवी पर्यंतच चित्रकला हा विषय असतो. त्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही; हे सांगितले. यानंतर घरी नातेवाईक व ओळखीच्या मंडळींकडूनही बोलणीच खावी लागली. या घटनेचा माझ्या मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला असावा. त्यानंतर त्यापेक्षा अव्वल नंबर शालेय जीवनात मी कधीच मिळवू शकलो नाही. पण याच बाईंनी वर्गातले मागचे फळे व वर्गाबाहेरचा फळा बरेचदा माझ्याकडून लिहून घेतलाय. अक्षर व चित्रकला दोन्ही चांगले असल्याने फक्त हस्तलिखितांच्या वेळी त्यांना माझी बरोबर आठवण यायची.
अभ्यासात तसा मी इतकाही काही वाईट नव्हतो. कधी कुठल्या विषयात नापास झालोय असेही नाही. वास्तविक मी "ढ मुलगा" या कॅटॅगरीत मोडणारा मुलगाच नव्हतो. पण तसा आव आणून कित्येक शिक्षकांनी शब्दश: नसला तरी माझा आत्मविश्वास मोडून काढला होता. तसा मी १० वीत ८० टक्क्यांच्या वर मार्क काढलेला मुलगा. पण ते सारे काही घाबरुन मिळवलेले मार्क. मनापासून मिळवलेले नव्हे. चित्रकला सोडून तसा कमीअधिक प्रमाणात मी सगळ्याच विषयांना घाबरायचो. गणितात जॉमेट्री ची ड्रॉईंगशी जवळीक वाटत असल्याने तो अल्जेब्रा च्या मानाने जरा सोपा वाटे. सायन्स मधला आक्रुत्यांचा भाग मला फार आवडत असे. पण शिक्षण मंडळ काय कुणाला आनंद मिळू देणार. आक्रुत्यांचा आनंद घालवण्यासाठी आक्रुत्या काढून नावे लिहावी लागत. आक्रुती कितीही चांगली काढली तरी नावांमुळे आमचा त्रिफळा उडायचाच. इंग्रजी विषयात "टू बी चे प्रत्यय" ही नक्की काय भानगड आहे हे बरेच वर्षं मला ठाऊक नव्हतं. त्यातून ड्रॉईंग च्या 2B ची पेन्सिल शी असणारी माझी जवळीक माझा घोळ वाढवत असे. पुढे कित्येक वर्षांनी to be or not to be मधलं हे टू बी आहे, हे कळल्यावर मी थंडच पडलो. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि स्पेलिंग; इंग्रजीतल्या या स्पेलिंगना मी त्रुतीय पंथियांपेक्षा जास्त घाबरत आलो आहे. त्यामानाने उच्चाराला तितके महत्व नव्ह्ते. आमच्या इंग्रजीच्या पुस्तकात "ए डब्ल्यू ई एसोएमी" असा एक शब्द होता. बर्याच वर्षांनी तो awesome असा उच्चारतात हे समजले. आमचे इंग्रजी हे इतके awesome होते.
आमच्या वेळी पुस्तकातल्या महत्वाच्या ओळींना अंडरलाईन करुन ठेवायचं एक फैड निघालं होतं. पण त्यातले महत्वाचे काय हे न ठरवता आल्याने व, आणि असे उभयान्वयी प्रत्यय सोडून बाकी सगळ्याच पुस्तकाला मी रेघा मारु लागलो. तशी लाईन मारायची सवय आमची तेव्हापासूनची आहे. असो.
पण, तश्या अनेक गोष्टी मला अजूनही कळलेल्या नाहीत. त्यातच hertz हे परिमाण मराठीत कसं लिहायचं हे मला अजूनही जमलेलं नाहीये. एकदा शास्त्राच्या पेपरात मी हटज किंवा हडज किंवा हटई असे लिहिले होते. त्यानंतर आमच्या तत्कालीन मास्तरांनी माझी जी हेटाई केली; काही विचारु नका. तसेच गणितातले फॉर्म्युले लक्षात ठेवणं हेही मला कधीही जमलं नाही. त्यामुळे लॉजिक समजूनही केवळ फॉर्म्युला पाठ नाही म्हणून मी गणितात मार खाल्ला आहे. "संप्रति वार्ता: श्रुयन्ताम्! प्रवाचक: बलदेवानंद सागर:" अश्या त्या संस्क्रुत बातम्या त्या काळचे हुशार विध्यार्थी ऐकत असंत. पण संस्क्रुत तर पाठांतरावर आधारीतच विषय आहे असे आम्हा "ढ" मुलांना सांगण्यात आले असल्यामुळे मी आधी संस्क्रुत सुभाषिते पाठ करणे, मग अर्थ समजत नसल्यामुळे त्याचा अर्थ पाठ करणे, आणि शेवटी कुठल्या श्लोकाचा कुठला अर्थ आहे ह्या जोड्या पाठ करणे; अशी मेहनत आम्ही पट्टीच्या धाकावर केली आहे. या असल्या नुसत्या घोकंपट्टीचा काय उपयोग? अर्थात पट्टीच्या धाकावर घोकली जाणारी क्रुती म्हणूनच त्याला घोकंपट्टी म्हणत असावेत. ही आमच्या संस्क्रुत ची अवस्था. घरी पूजाविधीत गुरुजी जे संस्क्रुत श्लोक म्हणतात ते समजले तर संस्क्रुत शिकल्याचा काहीतरी उपयोग.
कुणीही महान लढवय्या, स्वातंत्र्यसैनिक, शास्त्रद्न्य किंवा तत्वद्न्य आमच्या अभ्यासात आला की लगेच किती मार्कांची टीप येऊ शकते? यावर त्यांचे महत्त्व मोजले जायचे. मग सनावळ्यांसहित ते पाठ करणारे परीक्षार्थी चांगले का त्यांचे खरे कार्य काय होते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करताना, सनावळ्या पाठ न केलेले विद्यार्थी चांगले? तसेही परिक्षेपुरतेच पाठ करायच्या अभ्यासक्रमातल्या पुस्तकांना, पाठ्यपुस्तक न म्हणता पाठपुस्तक म्हणायला काहीच हरकत नाही. पण बहुधा ते ठरवणारे ग्रुहस्थ साठ्ये आडनावाचे असले पाहिजेत. कारण त्याशिवाय त्यांनी आपल्या आडनावाप्रमाणे ठ ला य जोडला नसता असं माझं स्पष्ट मत आहे. पण नेमकं नको तिथे आपलं स्पष्ट मत व्यक्त केल्यानेही मी बराच मार खाल्ला आहे. मला आमचे चित्रकलेचे शिक्षक आवडतात हे माझं स्पष्ट मत आमच्या शास्त्र शिकवणार्या शिक्षकांना न आवडल्याने सहावीत त्यांनी डूक धरुन मला चांगलाच चोपलाय. एखादा विषय आवडत असल्याने त्या विषयाचे शिक्षक आवडणं हे किती साहजिक आहे. पण संपूर्ण वर्गात मी अन् माझा मित्र सोडून बाकी सर्वांना शास्त्राचे शिक्षक आवडत होते. त्यांचा इगो दुखावला गेला आणि मग माझं गालफाड.
"मराठी असे आपुली मायबोली" वगैरे ऐकल्यामुळे व स्वत:ची मात्रुभाषा असलेला हा मराठी विषय अवघड जाण्याचे खरेतर काही कारण नाहीये. कवितेतल्या यमकांच्या जोड्या काय, उत्प्रेक्षा आणि उपमा काय? मला तर उपमा म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटायचं. पण "कवीने येथे बुडत्या सूर्याची उपमा कोणाला दिली आहे?" असल्या कुठल्यातरी प्रश्नानंतर ते सुटलेलं तोंडचं पाणी पळून जायचे. आम्हाला जे धडे होते ते केवळ आम्हाला धडा शिकवण्यासाठीच तयार केले होते अशी मला खात्री आहे. धडे वाचायला मला आवडायचं पण संदर्भासहित स्पष्टिकरण या प्रकाराने मात्र मला चांगलाच धडा शिकवला. छे! शाळेत मराठी भाषा, नव्हे एकंदर पुस्तकांविषयीच जो तिरस्कार निर्माण झाला, तो दूर करायला वयाची विशी पार करावी लागली.
प्रत्यक्ष परिक्षेच्या काळात "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" यातलं "एकमेका सहाय्य करु" इतकंच सोयीस्कर रित्या आम्ही पाळत असू. चित्रकला विषय सोडल्यास बाकी सर्वच विषयात मला दुसर्यांचे सहाय्य घ्यायची वेळ यायची. आमच्या शाळेतला चित्रकलेचा वर्ग मात्र इतका सुंदर व सुसज्ज चित्रकला वर्ग होता, तितका आमच्या कला महाविद्यालयात सुध्दा नव्हता. प्रशस्त जागा, खास चित्रकलेसाठी योग्य असे बाक, भिंतींवर सुंदर चित्रांच्या फ्रेम्स. या वर्गात खिडकीतून येणार्या सुंदर प्रकाशात बसून मी नेचर ड्रॉईंग शिकलो, स्टील लाईफ शिकलो, तासंतास बसून संकल्पचित्रं रंगवली. इतकंच काय तर ५वी ते ७वी च्या सहामाही व वर्षिक परीक्षेचे पेपरही तपासायला मदतही केली. मी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या चित्रकला शिक्षकांच्या आग्रहास्तव शाळेत त्यांना मदत करायला जात असे. चित्रकलेच्या पेपरांचे योग्यतेनुसार वर्गीकरण करायचे. मग आमचे सर मार्क देताना मला विचारायचे किती देऊ. ४६, ५८, ४१ असे मी सांगत असे आणि त्यांना योग्य वाटल्यास तेच मार्क त्या पेपरला मिळत. चित्रकलेच्या फईल्स, पेपरांचे गठ्ठे लावणे वगैरे बराच वेळ काम करुन दमल्यावर कांदा भजी व चहा सरांतर्फे मिळत असे.
दहावीत असताना, बोर्डाचे पेपर हे नेहमीच्या फुलस्केप कागदापेक्षा रुंद असतात हे समजले. त्यामुळे दोन्ही बाजूला पुरेसा समास सोडून, जाड पॉईंटच्या पेनाने सुटसुटीत व मोठ्या अक्षरात, प्रत्येक मुद्दा स्वतंत्र ओळीवर असा पेपर लिहिला असता; अर्ध्या पानाच्या आत संपणारा उत्तराचा मजकूर पानभर पुरुन उरतो व भरपूर पुरवण्या लावल्याने आपल्या पेपराचे चांगले वजन परिक्षकावर पडते. असा कानमंत्र आम्हाला मिळाला होता. पण त्यातल्या मजकूरापेक्षा आम्ही हस्ताक्षरावरच जास्त मेहनत केल्यामुळे अपेक्षित निकाल काही गवसला नाही. शाळेतून बाहेर पडल्यावर आयुष्याचा सूर गवसला, हे काही कमी नाही. "मनाप्रमाणे झाले तर चांगले, मनाप्रमाणे नाही झाले तर जास्त चांगले" असं कुणीतरी म्हणून ठेवलंय ते एकप्रकारे बरोबरंच आहे. आज मागे वळून बघताना, शालेय जीवनात मिळालेले चित्रकलेचे बाळकडू माझ्यातल्या कलावंतासाठी अम्रुतासमान ठरले हे मात्र निश्चित.
वी.सु.देशपांडे
१२/१०/२०१० पुणे.
टीप- सदर लेखात व्यक्त केलेली मते ही माझी व्यक्तिगत आहेत. त्याच्याशी कुणी सहमत नसल्यास हरकत नाही. तुमच्या मतांचाही मी तितकाच आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मात्र क्षमस्व.
खिचीक - गॉन केस
1 week ago

8 comments:
या नावाने आधी प्रसिध्द झालेल्या पोस्ट च्या प्रतिक्रियेत एक महत्वाची सूचना आली होती. त्या व्यक्तीने साहजिकच Anonymously ती दिली होती. त्या सूचनेचा आदर करुन पोस्ट मधे योग्य ते बदल केले आहेत. त्यामुळे ती प्रतिक्रिया देणार्यांचे धन्यवाद. हे दुरुस्त करताना तुम्ही लिहिलेल्या मौल्यवान प्रतिक्रिया डिलीट झाल्या त्याबद्दल क्षमस्व. पण पोस्टमधे जे बदल झाले ते योग्य झाले हे जास्त महत्त्वाचे आहे. तरी आपण या लेखाचा मनमुराद आस्वाद घ्यावा.
-वीरेंद्र देशपांडे
तसेही परिक्षेपुरतेच पाठ करायच्या अभ्यासक्रमातल्या पुस्तकांना, पाठ्यपुस्तक न म्हणता पाठपुस्तक म्हणायला काहीच हरकत नाही ...its true :(
Hi Veerdya,
leka bhari lekh lihila ahes................... pan honestly mala thoda negative vatla sur............. ani tula chitrakalechya markavarun bolnara mi tar navhato ( yacha arth mi hushar hoto asa nahi :-D) pan chitrakalecha mala matra raag yaycha ani vatayache chitrakaleche mark dharu nayet................ and I used to be jaleous of people getting ahead due to Chitrakala.........
Anyways mazya mate ata tyache mala kahi vishesh vatat nahi ani we have come a long way............ but maja ali yaar lekh vachun............ went back to those school days.............
Hi Veerdya,
kup chan lekh lihla aahes manat tya sarv junya divas chya athavni jagrut zalya.
tuzya lekhani tun aapan sarv 11 varshani bhetalo tya divsa vishei thode lihales tar mala nakii avdel
:).
keep writing like this.
class. amhi tula "hushar" mulgach samzaycho! I did not know u used to feel pressured! kamale.
But nice, u are doing what u like to do - kantya
Hi viradya,
sahi lihilas. chaila shikshakanvarcha raag asahi kadhta yet asel tar tula mazya shubhechha. ata naave pan tak. full support. bharich. keep it up. I wish you all success in your life. cheers.
jaydeep khajure
sanglyanchya comments farach jabardasta aahet !!! itkya pramanat response milel ase vaTlech navhte... thanks a lot. aaNi "vedya" to koN hota he malahi ata aathvat nahiye. mi tya velcha maza point of view mandla aahe, baki kahi nahi. ata mazya manat kahich katu urlele nahi. To jo koni asel tyalahi vait vatun ghaychi garaj nahi. mi aaj mazya field madhe successful zaloy mhanun kadachit mi he bolu shaklo. chitrakalet mala kahi karta ale naste tar. tya hushar mulache bolne jasta practicaly correct hote. so konihi please personaly gheu naka aaNi mulich vaait vatun gheu naka. mala maza point of view, maze tya velche bhaava-vishwa mandayche hote. thanks again for all comments and views
-virdya
Post a Comment